सराफ बाजारपेठेला ‘सोनेरी’ तेजी
सोन्याचा भाव १० ग्रॅमसाठी ५९ हजार रुपयांवर गेला. घडणावळीवर मेकिंग चार्जेसवर ४० टक्के कॅशबॅक व्हाऊचर दिले आहे. – मयूर सोलंकी, संचालक, सोलंकी ज्वेलर्स, जुनी सांगवी.
पिंपरी, ता. २१ : गुढीपाडव्याच्या सणासाठी सराफ बाजारपेठ सज्ज झाली आहे. सोने व चांदीचे दागिने खरेदी करणे, वाहन व गृह खरेदी शुभ मानले जाते. त्यामुळे शहरातील सराफ बाजार, वाहन बाजार गर्दीने फुलून गेला होता. सराफ दुकानांमध्ये महिलांसाठी खास दागिने विक्रीसाठी आले आहेत. त्यात कमी वजनाच्या दागिन्यांना मोठी मागणी होती. पारंपरिक असलेली नथ, मोरणी, हार, बांगड्या, अंगठ्या व नक्षीकाम असलेल्या दागिन्यांनाही मागणी होती. सोन्याच्या दागिन्याबरोबरच चांदीच्या दागिन्यांनाही यंदा चांगली मोठी मागणी होती. रविवारी सोन्याच्या भावात काही प्रमाणात घसरण झाली होती. दहा ग्रॅमला (२४ कॅरेट) ५९ हजार रुपये तर २२ कॅरेटला ५५ हजार ५०० असा सोन्याला भाव आहे. चांदीला ६८ हजार रुपये किलो आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर लग्नसराईची खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत असल्याचे चित्र सराफीपेढ्यांमध्ये पहायला मिळत आहे.
लोकांना सोन्या-चांदीचे चांगलेच आकर्षण आहे. विशेषत: सण, उत्सव, घरगुती समारंभ यानिमित्त महिला वर्ग आवर्जून दागिन्यांची खरेदी करतो. गुंतवणुकीचा उत्तम मार्ग म्हणूनही सोने चांदीचा विचार केला जातो. मराठी नववर्षारंभ मानला जाणारा गुढीपाडव्यासाठी सोन्या-चांदीची खरेदी केली जात आहे. दरम्यान, सोने कधी स्वस्त होणार अशी वाट पाहणाऱ्यांसाठी आता सोन्याचे भाव गगनाला पोचला आहे. सोन्याने तब्बल ५९ हजारांचा भाव गाठला आहे. त्यामुळे सोने विकणाऱ्यांसाठी सोन्याचे दिवस आले आहे, तर गुंतवणूकदारांनादेखील फायदा मिळत असल्याने सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला आहे. गुढीपाडव्याला नेहमी दागिन्यांचे ३० टक्के बुकिंग होते आणि ७० टक्के खरेदी होते. मात्र, यंदा सोन्याचा भाव अधिक असल्यामुळे ग्राहक दागिन्यांचे बुकिंग फारसे करतील असे वाटत नाही. त्यामुळे दागिने पाहून तिथल्या तिथे खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे प्रमाण वाढेल, असा दावा राहुल सोलंकी यांनी केला.